
कलाक्षेत्र- चित्रकला. ड्रॉईंग आणि पेंटींग
पत्ता- फ्लॅट नं, ८, स्वाती अपार्टमेंट, सर्व्हे- १८/२/2,. इंगळे नगर,
वारजे जकात नाका, पुणे-५८
फोन. २४४३००७१
मोबा. ९८२२०१२३४९
ईमेल- artistbhaskar@yahoo.com
जन्म दिनांक- १.१.१९७०
गुरु- स्वतः
विशेष पुरस्कार- रोटरी क्लब ऑफ लातूर-१९८७, स्वतंत्र्य सैनिक सेवा समिती, ठाणे- १९८८. मार्टीन्स यूथ क्लब, पुणे- १९८९, संस्कार भारती,पुणे- १९८५, द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, पुणे- २००९
विशेष माहिती- वैयक्तिक २३ चित्रपदर्शने, १७ चित्रप्रदर्शनात सहभाग, सतत १३ वर्षे निसर्गचित्रांचे कॅलेंडर्स प्रकाशित.

(संस्कार भारतीच्या कलायात्री दैनंदिनी २०१२ मधून साभार)
रंगरेषांत तळपणारा भास्कर...
जाणिवांना कलात्मक आविष्काराचे रूप देताना त्यांच्यातील कलाकार पूर्णपणे इतिहासात हरवून जातो. रंगरेषा मुक्तपणे कागदावर उमटू लागतात. चैतन्यरूपी सप्तरंग कुंचल्याच्या साथीने अशी किमया साधतात, की ते चित्र पाहणारा थक्क होऊन जातो. एखाद्या दुर्गाची लांबवर पसरलेली अजस्र माची आणि भव्य महाद्वार, कोवळ्या उन्हात झळाळणारे मंदिरांचे कळस, लेण्यांतील मूर्ती आणि चित्र पाहताना त्या ठिकाणचा इतिहास उलगडू लागतो आणि तरुणाईच्या नवनिर्मितीचा ध्यास चित्रांत पुरेपूर उतरल्याची अनुभूती मिळते.
चित्रकार असो वा शिल्पकार, त्यांची भावनांना केवळ कलेद्वारे इतरांपर्यंत पोचविण्याची हातोटी, निर्जीव माध्यमातून सजीव भाव निर्मिण्याची किमया... सारे काही थक्क करणारे असते. कारण पाहणाऱ्याला ती कला काही वेगळा संदेश जसा देते तशी प्रेरणाही. कुंचल्यातून इतके जिवंत दृश्य साकारते तरी कसे, हीच उत्सुकता रंगचित्रकार भास्कर तुकाराम सगर व त्यांच्या ग्रुपपर्यंत घेऊन गेली. त्यांनी साकारलेली निसर्गाची, किल्ल्यांची, लेण्यांची व इतर चित्रे पाहिल्यावर तरुणाईच्या आजच्या ज्या काही ठराविक "ऍक्टिव्हिटी'ज असतात त्यापेक्षा हे काम नक्कीच सरस आणि वेगळे वाटले.
चिंचोलीराव वाडी (जि. लातूर) या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातल्या भास्करने पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयात येऊन "जीडी आर्ट'चा डिप्लोमा पूर्ण करेपर्यंतचा प्रवास त्यांच्या चित्रांतील रंगांसारखाच गहिरा वाटतो. आज एक व्यावसायिक चित्रकार होऊनही त्याच्यातील "स्ट्रगलिंग युथ'चा "स्पार्क' जराही थंडावलेला नाही. नवे चित्र साकारण्यासाठी भास्कर आणि त्याच्या ग्रुपमधील मंडळी जेव्हा एखाद्या दुर्गाची वारी करतात तेव्हा त्यांचा दिनक्रम असतो तो चित्र साकारतच गडांवर पोचण्याचा. या कामी त्यांना संजय वाटवे, महेश ओव्हाळ, अनय करंबेळकर, सागर शिरपुडकर व ज्ञानेश्वर शेळके ही दोस्त मंडळी सोबत करतात. तहान-भूक हरपून साकारलेली त्या-त्या दुर्गांची अप्रतिम चित्रं परतताना त्यांच्या सोबतीला असतात.
भास्करने साकारलेल्या दुर्गचित्रांपैकी देवगिरी, शिवनेरीवरील शिवछत्रपतींचे जन्मस्थान, तोरण्याची बुधला माची, राजगडाच्या बालेकिल्ल्याचे महाद्वार, पुरंदरचा बिनी दरवाजा, प्रतापगडची माची, सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा आणि रायगडची चित्रे अक्षरशः आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा प्रत्यय देतात. नुकतीच त्याने अजिंठा, वेरूळ, गांधारपाले, कान्हेरी, भाजे, कोंडाणे, घारापुरी, बेडसा, पांडवलेणी या लेण्यांची अप्रतिम चित्रे साकारली आहेत. अजिंठ्याच्या लेणीतील प्रसिद्ध पद्मपाणी बोधिसत्त्वाचे चित्र तर अफलातून आहे. सध्या तो दर वर्षी वेगळी थीम घेऊन चित्रांच्या दिनदर्शिका करतो आहे.
त्याबाबत माहिती देताना भास्कर म्हणतो, ""चित्रांची आवड लहानपणापासूनच होती, मात्र त्याचे अभ्यासपूर्ण प्रशिक्षण घेण्याची इच्छा पुण्यात घेऊन आलो. कुंचल्यातून काही साकारण्यापूर्वी निसर्गाबरोबर संवाद असावाच लागतो. जेव्हा तुम्ही तो संवाद साधता तेव्हाच ते साकारले जाते. गडकोट, लेणी, मंदिर हा सांस्कृतिक ठेवा उपेक्षित आहे. तरुणांना त्यासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे. इतरांना आपल्या कलेतून किमान त्या ठिकाणी जाण्याची इच्छा व्हावी, याच भूमिकेतून दिनदर्शिकांची कल्पना सुचली आणि त्याचे काम सुरू ठेवले.''
भास्कर व त्याच्या ग्रुपचे काम दुर्गअभ्यास करणाऱ्या आणि त्या वेगळ्या वाटेवर जाण्याची इच्छा असणाऱ्या युवकांना नक्कीच प्रेरित करणारे आहे. भास्करची चित्रे आज विविध देशांत पोचली आहेत, तरीही तो आहे तसाच साधा आहे. गावाकडच्या मातीशी जोडलेली नाळ आणि पालकांनी दिलेल्या संस्कारांनीच इथवर पोचविल्याची त्याची भावना आहे.
इतिहासअभ्यासक निनाद बेडेकर, प्रा. विजय देव आणि प्र. के. घाणेकर यांचे मार्गदर्शन व कौतुकाची थाप सातत्याने प्रेरित करीत असल्याचेही तो आवर्जून सांगतो.
रंगरेषांशी आणि निसर्गाशी दोस्ती करण्याची किमया साधलेल्या या तरुण मित्राचे काम पाहताना "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' असेच वाटत राहते.
प्रसाद पवार
prasad.pawar@esakal.com
http://72.78.249.107/esakal/20091229/5524327012816306288.htm
No comments:
Post a Comment