Total Pageviews

Saturday, February 8, 2014

ध्येय्यवेडा ,तत्त्वनिष्ठ कलासाधक राजदत्त


धोतर, पांढरा अर्ध्या बाहिचा हाफ नेहरू शर्ट. डोक्‍यावर जन्मजात टेंगुळ. चेहऱ्यावर मिस्कील भावार्थ हसण्याचे भाव. धीरगंभीर प्रकृतीचा आविर्भाव. कलासक्त. विचारतात सतत बुडालेले. मात्र कलेत कुठेही तडजोड न करता स्पष्ट बोलणारा काळे सावळे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिग्दर्शक राजदत्त.


त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय अंबादास मायाळू.संघाच्या शिस्तीत वाढलेला ध्येय्यवादी कलासक्त व्यक्तिमत्त्व . राजदत्त.राजा परांजपेंच्या पठडीत वाढलेल्या राजदत्तांचे चित्रपटही समाजातल्या संस्कारांना आकार देणारे, भावभावनांचे प्रकटीकरण करणारे आणि व्यवसायापेक्षाही कलेला अधिक उठाव देणारे.


त्यांचा आठवणीतला पहिला चित्रपट म्हणजे संत गाडगे महाजांवरचा " देवकीनंदन गोपाला "हा चित्रपट. नंतर शापित आणि अलीकडला लक्षात राहणारा म्हणजे पुढचं पाऊल. त्यांच्या अजिंक्‍य देवने नायकाची भूमिका केलेला म्हणजे सर्जाही आठवतो.कलेशी प्रामाणिक राहणाऱ्या या दिग्दर्शकाने दूरदर्शनवर केलेली मालिका गोट्या आजही आठवते ती त्यांच्या दिग्दर्शमामुळे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी मालिकेच्या दिलेल्या शीर्षक गीताने.संस्करभारतीचे अध्यक्षपद भूषविणारे राजदत्त यांचे विचारही प्रभावीपणे सतत रसिकांच्या कानी पडत असतात. चित्रभूषण पारितोषिकाचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.


मनोरंजन हा कलेचा प्रमुख हेतू न राहता, समाजप्रबोधन हाही कलेचा विषय असावा. आणि कलेशी संबंधित प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी त्यांचा आग्रही मागणी असते. ते स्वतःही ते कटाक्षाने पाळतात. म्हणूनच आजच्या मनोरंजन जमान्यात राजदत्तांसारखे अनेकजण मागे पडल्याचे चित्र दिसते.


सावरकर हे त्यांचे दैवत. हिंदुत्व हा धर्म. आणि कला हे जीवनाचे धेय्य. अशा कलासेवेत अविरत कार्य करणाऱ्या धेय्यवादी दिग्दर्शकाला गदिमांच्या नावाने दिला जाणार गदिमा पुरस्कार जाहीर झाला याचा माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेमकरणाऱ्या अनेकविध रसिकांना आनंद झाला आहे.

राजदत्तांना तमाम मराठी जनांचा प्रणाम.

आम्हाला तुमचा अभिमान आहे.


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
 
 
 
 राजदत्त यांच्यासारखा माणूस चित्रपटसृष्टीत असणे हेच मुळी आश्चर्य आहे. खादीचा अर्ध्या बाह्यांचा सदरा, धुवट धोतर, खांद्याला झोळी, दाढी वाढलेली अशा अवतारातली ही असामी शूटिंगच्या ठिकाणी कुठल्यातरी कोपऱ्यात एखाद्या बाकड्यावर डोळे मिटून चिंतन करताना दिसायची. कधी फिल्मसिटीतल्या एखाद्या झाडाखाली दुपारची चक्क झोपलेली दिसायची. प्रत्यक्ष सेटवरही खूप हळू आवाजात बोलत सावकाश काम करताना दिसायची. शूटिंग सुरू असलेल्या चित्रपटाचे हे दिग्दर्शक आहेत, हे कुणाला सांगूनही खरे वाटले नसते. या माणसाचे दिग्दर्शकीय मोठेपण असे की, ज्या काळात मराठी सिनेमाला घरघर लागली होती, वर्षातून दहा ते पंधरा सिनेमे कसेबसे बनायचे आणि मराठी सिनेमा हा अनेकांच्या थट्टेचा विषय व्हायचा त्या काळात त्यांनी उत्तम चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीची लाज राखली. ते ऐंशीचे दशक होते. 'राघूमैना', 'शापित', 'पुढचं पाऊल', 'देवकीनंदन गोपाला', 'माझं घर माझा संसार', 'हेच माझं माहेर', 'अरे संसार संसार', 'मुंबईचा फौजदार' असे वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले. या चित्रपटांना स्वत:चा असा एक दर्जा होता.

राजदत्त अर्थात दत्ताजी मायाळू हे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपे यांचे शिष्य. तरुण वयात नोकरीच्या शोधात दत्ताजी मद्रासला गेले होते. तिथे त्यांना 'चांदोबा' या मुलांच्या मासिकाच्या संपादकाची नोकरी मिळाली. राजा परांजपे यांना मदासच्या चित्रपटाची ऑफर आल्यामुळे ते तिकडे गेले तेव्हा मराठी समजणारा असिस्टंट हवा म्हणून त्यांनी दत्ताजींना सहायक दिग्दर्शक म्हणून घेतले. राजाभाऊंचा प्रभाव दत्ताजींच्या विषय निवडीपासून ते काम करण्याच्या पद्धतीवर पडलेला दिसतो. 'मधुचंद्र' हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास पुढे अधिकाधिक संपन्न होत गेला. 'गोट्या' ही सुंदर टीव्ही मालिका त्यांनी बनवली. त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील मालिकाही उत्तम होती. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेली चित्रपट कथेबद्दलची विलक्षण समज. आपला मुद्दा ते शांतपणे, अनाग्रही राहत तरीही प्रभावीरीत्या समजावून देतात. त्यांच्या साधेपणाचेही अनेकांवर दडपण येते. दुसरी त्यांची खासीयत म्हणजे सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना असलेली कमालीची आस्था. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीचे ते अध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्या ठायी अभिनिवेश कधीच नसतो. वनवासी कल्याण आश्रमशाळांसाठी ते ज्या तळमळीने फिरतात, मुलांमध्ये काम करतात ते पाहून यांना चित्रपटक्षेत्र अधिक प्यारे आहे की समाजसेवा असा प्रश्न पडतो. त्यांना गदिमा पुरस्कार मिळणे म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पुरस्कार जाणे आहे. 
 
 
सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव.विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला. मधुचंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
गाजलेले चित्रपट -
  • मधुचंद्र,
  • राघूमैना,
  • शापित,
  • पुढचं पाऊल,
  • देवकीनंदन गोपाला,
  • माझं घर माझा संसार,
  • हेच माझं माहेर,
  • अरे संसार संसार,
  • मुंबईचा फौजदार
    असे वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले.
 

No comments:

Post a Comment