Total Pageviews

Friday, April 13, 2012

व्हायोलीन वाद्यातून परिचित-चारुशीला गोसावी


नमस्कार,
गेली ३२ वर्षे मी व्हायोलीन या वाद्यातून आपल्यापैकी अनेकांना परिचित आहे. अनेकविध कार्यक्रमांना साथ करुन आणि स्वतंत्र व्हायोलीन वादनाचे कार्यक्रम करुन मी तुमचे मन रिझविले. आज मी एका स्वतंत्र कार्यक्रमाची निर्मिती करुन तुमच्यापुढे येत आहे. सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी मला माझी स्वतंत्र वादक म्हणून ओळख करायची ही संधी दिली आहे.
पुण्यात १२ फैब्रुवारी २०१२ ला स्वतंत्र व्होयोलीन वर सादर केलेला मराठी आणि हिंदी गाण्यांच्या कार्यक्रम `व्हायोलीन गाते तेंव्हा...` ला उत्तम प्रतिसाद लाभली. त्यातून लोकबिरादरी प्रकल्पासाठी ५८ हजार रुपये निधी देऊ शकलो. आपल्याही शहरात हा कार्यक्रम करण्याची जबरदस्त इच्छा आहे. आपल्या प्रतिसादावर त्याचे यश अवलंबून आहे. आपल्या आर्थिक पाठबळावर ते सारे अवलेहून आहे. यातून खर्च वजा जाता जमा होणारी निधी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्यासाठी पाठविला जाईल.
मी हे शिवधनुष्य उचलले आहे. पेलण्याची जिद्द तुम्ही माझ्या वादनावर प्रेम करणारे असंख्य रसिकांमुळेच मिळणार आहे.
केवळ मनोरंजन आणि त्यातून चार रसिकांची वाहवा मिळवाव अशी माझी इच्छा नव्हती आणि नाही. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची माहिती होती.. त्याच्या `लोकबिरादरी प्रकल्पाला` निधी द्यावा आणि त्यातून काही सेवा घडावी अशी खूप इच्छा होती. सुभाष इनामदारांचे स्नेही अरविंद तेलकर यांच्या मदतीने योगायोगाने ती जूळून आली. अनिकेत आमटे यांनी या कार्यक्रमालाच नव्हे तर असे १५ कार्यक्रम करावेत असे पत्रही दिली. आम्ही ते शिरोधार्ह मानून स्व. बाबा आमटे यांनी लावलेल्या रोपट्याला कांही अंशी तरी आर्थिक धन गोळा करुन देऊन त्या महामानवाला वंदन करण्याची हा संधी घेतली.
खरच आज मी खूप समाधानी आणि अतृप्त आहे. समाधान याचसाठी की मला माझे स्वतंत्र अस्तित्व एक व्हायेलीन वादक म्हणून सिध्द करण्याचीसंधी मिळाली. माझ्या साधनेत कीती बळ आहे आणि माझे गुरु व पिता पं. भालचंद्र देव यांनी माझ्यात जी व्हायोलीनची कला रुजविली त्याचेही उतराई होण्याची संधी दिली..आणि अतृप्त यासाठी कलेची सेवा हा प्रचंड महासागर आहे. त्यात आपण कितीही कलेचे पाणी ओतले तरी कमीच. मी एक छोटी कलावंत आहे. त्या सागरात अनेकांनी घागरीने पाणी ओतले. मी त्यातच एक थेंब टाकतेय याची जाणीव आहे.
आता हवे आहे ते एकच.... तुमचा आशीर्वाद आणि कार्यक्रम करण्यासाठी तुमचा पाठिंबा.
मला तो माझ्या वादन क्षेत्रात कांहीतरी स्वतःचे नाव झळकवण्याची संधी द्याल अशी आशा करते आणि इथेच नमस्कारासाठी हात जोडून थांबते.



आपली ,

सौ. चारुशीला गोसावी, पुणे

व्हायोलीन गाऊ लागले..तेंव्हा....टाळ्यांतून दाद मिळते

स्वर्गीय बाबा आमटे यांनी रुजविवेल्या आणि डॉ. मंदाकिनी आणि प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी रविवारी पुण्यात सौ. चारुशीला गोसावी यांचे व्हायोलीन गाऊ लागले..तेंव्हा.... टाळ्यांतून रसिकांची दाद मिळाली. बालशिक्षण मंदिराचे सभागृह व्हायोलीनच्या सुरावटींनी हेलावून गेला..कधी आनंदाने तर कधी गहि-या पण सुरेल बोलांनी.

सांस्कृतिक पुणेचे वतीने हा दिवस नोंदविला गेला तो या एका सुरेल पण समर्थ व्हायोलीन वादकाच्या मराठी- हिंदी गितांच्या बोलांचे ध्वनी रसिकांना मोहवित गेले. अनेक संस्थांचे प्रतिनीधींच्या उपस्थितीत साजरा केला गेला हा स्वरोत्सव. अनेक वर्षांच्या वाद्यावरच्या हुकमतीनंतर चारुशीला गोसावी प्रथमच आपला स्वतंत्र वादनाचा ..तोही लाईट संगीताचा कार्यक्रम `व्हायोलीन गाते तेंव्हा...` प्रथमच सादर करीत होत्या. आणि हा सारा संकल्प लोकबिरादरी प्रकल्पाच्या निधीसाठी.

हळुहळु रसिक गर्दी करु लागले. ख्यातनाम चित्रकार रवि परांजपे. लंडन स्थित रहिवासी किशोर देशमुख. गुरू पं. भालचंद्र देव यांच्या हस्ते शुभारंभानिमित्तचा नारळ वाढविला गेला आणि...व्हायोलीन गाते झाले....

मुळातच कंठसंगीताला जवळचे सूर म्हणून संगीत क्षेत्रात लोकप्रिय असेलेल्या व्हाय़ोलीन या वाद्यावरची हुकूमत सिध्द करीत सौ. चारुशीला गोसावी ...प्रथम तुला वंदितो या स्व. अनिल मोहिले यांनी संगीतबध्द केलेल्या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. टाळ्या पडल्या..अणि एकेका गीतांच्या सुरावटीने ते सारे शब्दच जणू व्हायोलीनच्या वाद्यातून उमटू लागले.... खरचं... व्हायोलीन गाऊ लागले...

विवेक परांजपे यांच्या सिँथसाय़झरने स्वरांचा आणि गीतांच्या मधल्या सुरावटींची हरकत हुकमी ऐकत आणि रविराज गोसावी यांच्या तबला बोलातून तालाची लय धरीत व्हयोलीन गात होते.... साथीला राजेंद्र साळुंके , मधुरा गोसावी तालवाद्यातून गाणी बोलत होती..ती रसिकांच्या ह्दयी झिरपत होती.

बाहेर लोकबिरादरीच्या निधीसाठी लोक मधूनच आपली मदत दानपेटीत देण्यासाठी येत होते. ती झोळी धनानी भरत होती. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, जनता सहकारी बॅंक, सिंडिकंट बॅंक, फौंउंटन म्युझिक यांनी या कार्यक्रमसाठी आर्थिक मदतीचा हात दिल्याने रंगमंचावर त्यांचे नाव झळकत होते. मात्र निवेदिका सौ. विनया देसाईंच्या तोंडून जेव्हा मदतीचे आवाहन झाले तेव्हा...तिकीट काढलेला रसिकही त्या मदतीसाठी उत्सुक होऊन आपले सहाय्य करीत असल्याचे चित्रही विलोभनिय होते. तुम्ही मदत योग्य कारणासाठी मागा लोक भक्कम पाठिंबा देतात...हा अनुभव होता.

`चांदणे शिंपीत जा`, `अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद घेतली. `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगतच गेलr. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत होत्या...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देत होते. `बोलो रे पपी`, `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांनी ठेका धरायला तर लावलाच पण..त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागले.

पं. भीमसेन जोशी ( माझे माहेर पंढरी) या भारतरत्नांच्या तोंडून गायल्या अभंगाला पेलण्याची ताकद गोसावी यांच्या वादनातून प्रकटपणे दिसत होती.

अखेरच्या टप्प्यावर या `चिमण्यांनो परत फिरा` हे अतिशय स्वरमेळांचे विविध आविष्कार घडविणारे गीत समर्थपणे सादर करून त्यांनी कमालीची घेतलेली मेहनत कारणी लागल्याचे जाणविले. `लागा चुनरीमे दाग` या लयकारींने आणि सुरावटींची मोहकता दाखविणारे गीत सादर करुन जेव्हा कार्यक्रम संपविला तेव्हा रसिकांनी ऊठून टाळ्यांचा कडकडात करून त्यांच्या व्हायोलीन कलेला दाद दिली.

असे कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध शहरात आणि हेमलकसाच्या अदिवासी मुलांसमोर सांस्कृतिक पुणेला करायचे आहेत. त्याचे हे आरंभीचे पाऊल आश्वासक आहे. त्यांच्या कार्याला आणि सौ. चारुशीला गोसावी यांच्या वादनाला आमच्या मनापासून शुभेच्छा.

व्हायोनीन गाते तेव्हा...टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..लोक डोलू लागतात..

भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..कलावंताचे कौतूक होते..

शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.ताल आणि लयींचा एकजीव होतो..पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...

सुभाष इनामदार, पुणे.

www.culturalpune.blogspot.com

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशिला गोसावी

कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या
वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या
चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा
होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा
व्यक्‍त करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही
ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये?

गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत.
गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.
पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण
झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी
वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या
वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी
यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची
गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर
आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव
झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती
त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर"
आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.
गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी
एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी
दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र
शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार
व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे
महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.
स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार
म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.
वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन
मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले.
त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .

स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून
व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता
नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे. पती राजय गोसावी निवेदक तर
मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे
व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा
होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या
स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या
त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या
आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या
स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या
या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे. आपल्याला कुणासारखे
तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा
मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.
घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा
असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा
अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे

त्यांच्याच काही गाण्यांची ही लिंक

http://www.youtube.com/results?search=Search&resnum=0&oi=spell&search_query=charusheela+gosavi&spell=1&sa=X

No comments:

Post a Comment